Monday, February 1, 2010

हे गाईज, हाय..!! कसा गेला लास्ट वीक? माझ्यासाठी तर फारच बिझी होता. कारण होत प्रजासत्ताक दिनाची पूर्वतयारी. शेवटच्या वर्षात असलो तरी प्रजासत्ताक दिनाकरीता मी अभ्यास आठवडाभर बाजूलाच ठेवून दिला. नाटय़मंडळाच्या मित्रांना एकत्र घेऊन मी प्रजासत्ताक दिनासाठी एक स्किट करतोय.मी या स्किटमध्ये तरूणांना देशभक्तीचे, आत्मीयतेचे महत्व पटवून देणाऱ्या वृध्द स्वातंत्र्यसेनानीची भुमिका करतोय. मला यावेळी आठवण होतेय ती माझ्या कॉलेजातल्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाची, स्वातंत्र्य दिनाच्या वेळी माझा शाळेत सत्कार होता त्यामुळे मी कॉलेजात नव्हतो म्हणून माझी उस्सुकता अधिक वाढली होती. शाळेत असताना मी कार्यक्रमांच्या आयोजनात पटाईत होतो, १५ ऑगस्ट असो वा २६ जानेवारी बाई कार्यक्रमांची पूर्वतयारी करता मलाच बोलवायच्या. हो आणि नववी आणि दहावीत असताना एम.सी.सीत होतो त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी परेडही करायला मिळाली फार आनंद व्हायचा, कॉलेजातही एन.सी.सी जॉईन करायचं होत पण एन.सी.सी ऑफीस सापडेपर्यत एन.सी.सीची प्रवेश प्रक्रीया बंद झाली होती. प्रजासत्ताक दिनाबाबतचा माझा कॉलेजचा पहिला अनुभव अतिशय वाईट आहे. प्रजासत्ताक दिनाची माहिती घेण्याकरीता म्हणून मी आदल्या दिवशी अमोलला फोन केला. अरे उद्या किती वाजता कॉलेजला भेटायच’, अमोल म्हणाला काय? अरे वेडा आहेस का तू..अरे आज रात्री आपण पिकनीकला जातोय तू येणारेस का?’ ‘अरे, पण प्रजासत्ताक दिनासाठी कॉलेजला जायला हवं आपण..’ ‘मित्रा आता आपण कॉलेजात आहोत शाळेत नाही..अमोलला पिकनिकला येत नाही सांगून एकटंच कॉलेजला जायच ठरवलं. पांढऱ्या रंगाचा झब्बा घातला होता अगदी पक्का देशभक्त बनलो होतो कारण अशी संधी पहिल्यादाच मिळाली होती, यापूर्वी फक्त शाळेचा युनिफार्म घालावा लागायचा. कॉलेजचे मैदान म्हणवल्या जाणाऱ्या त्या छोटय़ाश्या भागात आलो आणि डोळ्यासमोरच दृश्य पाहून थक्कच झालो, समोर जे काही चालले होते ते माझ्यासारख्याला न पटणारे होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना द्यायला जेमतेम तीस-पस्तीसच मुले होती आणि तीही एन.एस.एसमधली. त्यांना येण भागच होत म्हणून. शिक्षकही बहुधा सक्तीनेच आले असावेत, यावेळी मला आमच्या शाळेतल्या केळसे बाईंची फार आठवण झाली. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या लहान मुलांना आर्वजून शाळेत आणायच्या. तसे वातावरण कॉलेजमध्ये अजिबात जाणवले नाही. बऱ्याच वेळा नंतर प्रश्नचार्य आले त्यांचे भाषण झाले, सगळ्यांनी ध्वजवंदना दिली, एक छोटेखानी कार्यक्रमही झाला, पण हे सुरू असताना माझ्या मनात वेगळेच विचार घोळत होते. सरकारची सक्ती आहे म्हणूनच प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन कॉलेजात होत असावेत, त्यामागची देशभक्तीची भावना हरवली तर नसेल? कदाचित यामुळेच तरूण पिढीला देशाविषयीच्या आत्मियतेचा अर्थ माहित नसावा, राजमुद्रा, राज्यघटना याविषयी माहिती नसावी. काहींची तर आपले राष्ट्रीय गीत नक्की कोणते इथूनच सुरूवात होते, मग ते पाठ असण्याचा विचार करणेच चूकीचे होईल. आपण कॉलेज डेजना गर्दी करतो मग ध्वजाला मानवंदना द्यायला का उपस्थित राहत नाही. कॉलेजने या दिवसांना विद्यार्थ्यांना उपस्थित रहाणे सक्तीचे करणे ही गोष्टच लज्जास्पद आहे. आपण देशाविषयी आत्मियता वाढावी म्हणून टि-शर्ट आणि कॅपवर राष्ट्रध्वज छापावा अशी मागणी करतो. पण हे म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या मागे लागण्यासारखे आहे. शाळेतील भारत माझा देश आहेही प्रतिज्ञा आपण नीट आठवली तर कोणालाच कोणत्याही प्रकारच्या सक्तीची गरज भासणार नाही. आय होप.. तुम्हीदेखील तुमच्या कॉलेजात, शाळेत, कॉलीनीत ६१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या प्रजासत्ताक भारताला अभिवादन केल असेल, करणार असाल.. जय हिन्द!!!

No comments:

Post a Comment