हाय.. व्हॉट्स अप? कूल ना.. तुम्ही ‘सवाई’ला होता का? ओ.. सवाई एकांकिका स्पर्धा , आम्हा नाटय़वेडय़ांसाठी ‘ऑस्कर’च जणू. हे माझ सवाई अटेंड करण्यचं चौथं वर्ष. पहिल्या वर्षी नाटय़मंडळाच्या मित्रांबरोबर सहज ‘नाईटआउट’ करायचा म्हणून आलो, पण त्यावेळी सादर झालेल्या एकांकिका आणि एकूणच त्या वातावरणात असलेला उत्साह यामुळे सवाई एकांकिका स्पर्धा म्हणजे माझा श्वासच बनली. मी ही या नाटय़दुनियेमध्ये जरा अपघातानेच शिरलो.
शाळेमध्ये नाटकांशी थोडाफार संबंध आला असला तरी मी नाटकवेडा वगैरे नव्हतो. हा किडा शिरला तो अर्थातच कॉलेजमध्ये आल्यावरच. कॉलेज सुरू होऊन चार ते पाच महिनेच झाले होते, कॉलेज ते घर आणि घर ते कॉलेज असाच माझा प्रवास असायचा त्यापलिकडे मला कॉलेजचे कॅन्टिन देखील माहित नव्हते. माझा मित्र सिद्धेश याने मला नाटकाच्या ऑडिशन्सबद्दल सांगितले. आम्ही आमच्या कॉलनीमध्ये एकत्र नाटकं बसवली होती. त्या दिवशी संस्कृतचं लेक्चर बंक करून ऑडिशनला पोहोचलो. बरेच जण आले होते, त्यातले काही माझ्यासारखे नवे होते तर काही जूने. त्या हॉलमध्ये गेल्यावर मला कळलं की आपल्याला पाच मिनिटांत अॅक्ट करून दाखवायचे आहे आणि माझ्याकडे तर काहीच तयार नव्हते, सॉल्लिड घाबरलो होतो, मला तर बसल्या जागीच घाम फुटत होता. माझं नाव दोनदा घेतलं गेलं तरी मला कळलं नाही शेवटी सिद्धेशने मला जबरदस्तीने स्टेजवर पाठवलं. आमचे दिग्दर्शक सुनील सर, ते चेहऱ्यावरूनच इतके खडूस आणि फिल्मी दिसत होते त्यांना पाहून तर माझं उरलं सुरलं बळही गेलं. पण माझी अवस्था बहुतेक त्यांना कळली असावी आणि त्यांनी मला टेन्शन न घेता परफॉर्म करायला सांगितले. खरंच त्यांच्या तोंडून येणारा ‘जाम भारी’ हा शब्द आणि चिडल्यावर तोंडीतून येणाऱ्य ओव्या आजही आठवतात कारण त्या ऑडिशनपासून नाटय़क्षेत्रात माझा झालेला प्रवास.. म्हणजे माझा प्रत्येक श्वासच होता.. तो न विसरता येणाऱ्या आठवणींचा एक नाटय़प्रयोग होता.. हाऊसफुल्ल!